पोलीस गृहप्रकल्प वेळेत पूर्ण झाले पाहिजेत : अजित पवार

पोलिसातील माणसाच्या मागे राज्य शासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पोलिसांसाठी मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्य शासन आवश्यक ती तरतूद करेल. मात्र, केंद्र शासनाकडूनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जावा. पोलिसांच्या गृहप्रकल्पांची कामे दर्जेदार व्हावीत. ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत. वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलिसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र, वेगवान हालचालींची आवश्यकता लक्षात घेता 'शिवनेरी', आरामगाड्यांचा प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही श्री. पवार यावेळी म्हणाले. पोलिसांच्या शिक्षण घेत असलेल्या मुलांसाठी वसतिगृहे मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात येतील. पोलिसांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.